Wednesday 14 October 2015

लिव्ह इन रिलेशनशिप आणि सेक्स...

लिव्ह इन रिलेशनशिप आणि सेक्स...
आजची उपवर जोडपी(?) लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास पसंती देतात. लिव्ह इन चा सोपा अर्थ म्हणजे- ‘पटलं तर आयुष्यभर एकत्र राहू, नाहीतर दुसरा जोडीदार आहेच!’ त्या दुसऱ्या व्यक्तीसोबतही काही वर्षे लिव्ह इन मध्ये राहून पुन्हा तिसरा जोडीदार निवडायचा! पुरोगामी विचारवेत्त्यांना वरवर ही स्त्री-पुरुषांची ‘चंगळ’ वाटते आहे, परंतु ते खरेच तसे आहे का? ‘लिव्ह इन’ मध्ये नेमकं काय घडलं पाहिजे? स्त्रीला किंवा पुरुषाला ‘लिव्ह इन’चा लळा का लागावा? ‘लिव्ह इन’मध्ये सेक्स महत्वाची भूमिका बजावेल का? लिव्ह इन मधील सेक्स कसा असतो? इत्यादी प्रश्नांची उकल करून घेणे गरजेचे आहे. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
इंटरनेटमुळे माहितीचे मायाजाल खुले झाले, सोशल आणि ग्लोबल होत होत स्त्री-पुरुष नको तितके अधिक जवळ येत गेले. आवडी निवडी तर समजू लागल्याच पण त्याही पुढे जाऊन सहवास कसा असेल, त्याचा किंवा तिचा शारीरिक स्पर्श कसा असेल, लैंगिक भावना कशा व्यक्त होत असतील या गूढ ज्ञानाची जिज्ञासा उफाळून येऊ लागली. कधी कधी त्यावर मोकळेपणाने चर्चासुद्धा करता येऊ लागली. चर्चा झालीच आहे तर अनुभव का नको घ्यायला? आणि अशा स्फोटक क्षणी स्त्री-पुरुष कोणतेही सामाजिक बंधन न पाळता एकत्र राहणे पसंत करू लागले...
स्पर्धेच्या जगात जबाबदारी नको, पण आयुष्याचा सर्व अंगाने ‘उपभोग’ घेता यावा यावर उपाय म्हणून लिव्ह इन ला उत्तेजना मिळाली. स्त्री आणि पुरुष दोघांनीही ही ‘नवी जीवनशैली’ अक्षरशः डोक्यावर घेतली. यामागील स्त्री-पुरुषांची मानसिकता जरी वेगळी असली तरी धागा एकच आहे... तो म्हणजे ‘विनापाश सुखोपभोग!’ एका रुममध्ये मित्र मित्र राहतात, मैत्रिणी मैत्रिणी राहतात मग स्त्री-पुरुष का नाही? जुळली मने आणि तनेही तर राहतील आयुष्यभर सोबत, नाहीच पटले काही विचार तर दुसरा पर्याय निवडता येण्याची मुभा लिव्ह इन मध्ये आहेच! भारतीय संस्कृतीत एकदा सात फेरे घेतले की ते उलट फिरवता येत नाहीत, पुरेसे न ओळखलेल्या जोडीदारासोबत आयुष्य कंठावे लागते, असमाधानाचे ओझे वागवीत लग्नाचे जोखड ओढावे लागते. ही बंधने लिव्ह इन मध्ये अजिबात नाहीत. ‘इन लव्ह’ची जशी जंगी पार्टी देता येते तशीच सामोपचाराने घेतलेल्या ‘ब्रेकअप’ची सुद्धा देता येऊ लागली आहेच. त्याचेच पुढील प्रौढ स्वरूप म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल.
काही वर्षे स्त्री-पुरुष एकत्र राहणार म्हटल्यावर नैसर्गिक शारीरिक ओढ म्हणून संबंध येणे साहजिक आहे. लग्नापूर्वी स्त्री कोणत्याही नियोजित वराला तुझी माझ्यासोबतची लैंगिक आगळीक कशी असेल? तुझ्या सेक्सच्या भावना तू कशा व्यक्त करशील? तुला सेक्स कसा करायला आवडतो? अशी प्रश्नावली एकांतातसुद्धा विचारू शकत नसते. काम हा सुखी जीवनाचा पाया असूनही त्याकडे आपली विवाहसंस्था सोयीस्करपणे दुर्लक्ष करतांना आढळते. पदरी पडलं पवित्र झालं या नुसार वैवाहिक दाम्पत्ये जीवन रडतखडत जगतांना आढळतात. लिव्ह इन मध्ये मात्र सर्वच ‘विषय’ अंतर्भूत होतात. क्षुल्लक बाबी सुद्धा प्रत्यक्ष अनुभवास येतात, त्यामुळे या व्यक्तीशी आपले आयुष्यभर जमेल की नाही याचा अंदाज बांधता येतो. तसेच गुणदोषांचे सांगोपांग परीक्षण करून पुढील नियोजित वैवाहिक जीवनात कसे आचरण ठेवता येईल, लग्न झाल्यास कसे टिकवता येईल, स्वभाव पुरेपूर समजल्याने वादविवाद उद्भवल्यास कसे समजून घेता येईल, रुसवा कसा काढता येईल इ.इ.चा अगोदरच विचार करता येतो. हा लिव्ह इन चा फायदा म्हणावा लागेल.
माहितीचा परिस्फोट झाल्याने स्त्री सर्वंकष ज्ञानात पारंगत झालेली आहे. त्या ज्ञानात कामशास्त्रही अंतर्भूत झाल्यास नवल ते कोणते? पूर्वी अनेक विषयांनी अनभिज्ञ राहिलेली स्त्री आता सर्वच विषयांत रस घेतांना दिसते. याचाच परिपाक म्हणून लिव्ह इन कडे पहावे लागेल. विनापाश आवडीच्या पुरुषासोबत काही वर्षे एकत्र राहण्याचा निर्णय घेणे स्त्रीसाठी सोपी गोष्ट खचितच नाही. काय आहे तिची त्यामागील मानसिकता?
स्त्री शिक्षित झाली म्हणतांना तिलाही गुह्यज्ञानाचे आकर्षण आणि अत्माभिमान आलेला असणे साहजिक आहे. लैंगिक सुख फक्त पुरुषाने मिळवणे किंवा ती क्रिया फक्त पुरुषाच्या सुखासाठीच असते, स्त्रीने केवळ उपभोग्य वस्तू म्हणून त्यात सहभागी व्हावे या जुन्यापुराण्या कल्पना आजच्या स्त्रीने धुडकावून लावलेल्या आहेत. लिव्ह इन मध्ये राहून तिला हेच सूचित करावयाचे आहे की केवळ पुरुषाचे चांगले दिसणे वागणे, प्रथितयश असणे महत्वाचे नसून त्याचे लैंगिक वर्तन कसे आहे याचा अंदाज घेऊनच त्याच्याशी आयुष्यभर जगायचे की नाही याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकणार आहे.
लिव्ह इन मध्ये असलेल्या पुरुषाला मात्र याबाबतीत नेहमीच सजग राहावे लागणार आहे. स्त्रीशी येणारा प्रत्येक शारीरिक संबंध यशस्वीच कसा होईल याचा प्रयत्न करण्याशिवाय त्याला गत्यंतर उरणार नाही. ती त्याच्यावर ‘सर्व’ बाजूंनी खुश झाली तरच त्याची राहणार आहे... अन्यथा लिव्ह इन साठी ‘दुसरी’ मिळणे देखील दुरापास्त होण्याची शक्यता असेल...!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment