Wednesday 21 October 2015

कामविश्व आणि ग्रंथसंपदा...

कामविश्व आणि ग्रंथसंपदा...

भारतीयांना कामविश्वाची ओळख खूप पूर्वीपासूनच होती. अशी आख्यायिका सांगितली जाते की ब्रह्मदेवाने धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांचे विवेचन करणारा असा एक लक्ष अध्यायांचा ग्रंथ रचला. यातील कामविषयक कामशास्त्रासंबंधी रचना नंदीने एक हजार अध्यायांमध्ये केली. या ग्रंथाचा संक्षेप श्वेतकेतूने पाचशे अध्यायांत केला. श्वेतकेतूचा काल उपनिषदांचा म्हणजे इ.स.पूर्व सुमारे १५०० वर्षे हा आहे. म्हणजे आपले भारतीय कामशास्त्र फार पूर्वीच बहरात होते. याच श्वेतकेतूने स्वैर संभोगाची प्रथा बंद करून विवाहसंस्था स्थापन केली. या ग्रंथाचा संक्षेप बाभ्रव्याने फक्त दीडशे अध्यायांत केला. चौथ्या शतकात वात्सायनाने हा ग्रंथ अभ्यासून आणखीन संक्षिप्त ग्रंथ लिहिला तो म्हणजे- ‘कामसूत्रम’ तेराव्या शतकात यशोधर इंद्र्पाल याने कामसुत्रम वर जयमंगल नावाची टीका लिहिली. ती आजही कामविश्वाची उकल करण्यात माहीर ठरते! सोळाव्या शतकापर्यंत सुमारे नव्वद ग्रंथ कामशास्त्रासाठी लिहिले गेले. कोकशास्त्र उर्फ रतिरहस्य, रसमंजिरी, रतिमंजिरी, रतिशास्त्र, कंदर्पचूडामणी, कलाविधीतंत्र, कामप्रकाश, शृंगारतिलक, कामसार, रतिचंद्रिका, कुचुमारतंत्र इ. इ. चा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. अकराव्या शतकातील खजुराहो, कार्ले नागार्जुनकोंडा, बदामी, अहिओले, भुवनेश्वर (१० वे शतक), मोढेरा, बेलूर, हळेबीड, कोणार्क (१३ वे शतक), विजयनगर येथील कोरीव लेण्यांमधून त्यावेळी प्रचलित असलेली कामसंहिता प्रदर्शित केलेली आहे. सोळाव्या शतकानंतर मात्र संस्कृत वाङ्मय लुप्त झाले आणि कामशास्त्र अश्लील ठरले!
पाश्चात्यांच्या कामविश्वाविषयीच्या ग्रंथासंबंधी बोलावयाचे झाल्यास ते उपनिषदांच्या काळी फारच मागासलेले म्हणावे लागतील. इ.स. पूर्व चौथ्या शतकात हिपॉक्रॅटीसने प्रजोत्पादनाविषयी माहिती दिली. गॅलनने तिसऱ्या शतकात कामविषयक मतप्रणालीवर प्रबंध लिहिला. रोमन साम्राज्य नष्ट झाल्यामुळे त्याने वैद्यकीय ज्ञानावर लिहिलेली दीडशे पुस्तके नष्ट झाली. नंतर थेट पंधराव्या शतकात लिओनार्डो दा विंची याने शरीररचनेची चित्रे काढली. सन १७९८ मध्ये थॉमस माल्थस याने संततिनियमन महत्वाचे आहे असे सांगितले. १८७२ मध्ये डॉ. चार्ल्स नोल्टन याने संततिनियमन विषयक माहितीपूर्ण पुस्तक लिहिले. मात्र तत्कालीन धर्मवेत्त्यांना ते मानवले नाही आणि नोल्टनला कारावास भोगावा लागला. अठराव्या शतकात युरोपात कामविषयक ज्ञानाची उर्मी निर्माण झाली. परंतु संभोग म्हणजे वीर्यनाश अशी चुकीची समजूत पसरली. धर्ममार्तंड आणि प्रशासन यांना कामविश्वाची संशोधनात्मक माहिती जनतेपर्यंत पोहचू द्यायची नव्हती. कारण धर्मवेत्त्यांना संभोगाबाबत उदासीनता आणि कमालीची घृणा वाटत होती. एकोणिसाव्या शतकापर्यंत कामविश्व अश्लील, घाणेरडे, अनैतिक आणि नीतिभ्रष्ट समजले जात होते. त्याबद्दल बोलणे, लिहिणे, वाचणे निषिद्ध मानले जात असे. त्याचा दुष्परिणाम असा झाला की नैसर्गिक कामप्रवृत्ती दाबून ठेवावी लागल्याने अनेक अपसमज, भीती जनमानसांत पसरली व काही कामसमस्या निर्माण झाल्या त्या आजही पहावयास मिळतात.
परंतु महत्वाची गोष्ट अशी की उपरोक्त संस्कृत वाङमय काय किंवा पाश्चात्यांचे ग्रंथ काय दोन्ही ठिकाणी पुरुषी वर्चस्व आढळून येत होते. स्त्रीच्या कामतृप्तिचा विचार झालेला नव्हता. पुरुषाच्या मैथुनानंदासाठीच अधिक प्रकारची संभोगसने, स्त्री शारीर वर्णन, पुरुष जास्त उद्दीपित होईल अशी वाक्ये वगैरे प्रकारे कामसाहित्य लिहिले जात असत. काळ बदलला आणि कामविश्व देखील बदलत राहिले.
विसाव्या शतकापासून मात्र कामविश्वाचा अभ्यास अधिक सखोलपणे होऊ लागला. ऑस्ट्रियातील चेताशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड हा कामविज्ञानाचा आद्य प्रणेता म्हणावा लागेल. त्याने एकूण २४ ग्रंथ लिहिले. हॅवेलॉक एलीस याने सेक्स विषयक मनोविश्लेषणात्मक असे सात खंड लिहिले. परंतु ते ग्रंथ अश्लील ठरवून त्याला कैद झाली. १९३५ मध्ये त्याची पुस्तके केवळ डॉक्टरांनीच वाचण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर इव्हान ब्लॉक, मॅग्नस हर्शफिल्ड, विल्हेल्म राईक यांनी कामविश्वात मोलाची भर घातली. कामविज्ञानात क्रांती घडवून आणली ती आल्फ्रेड किन्से याने. त्याचा कालखंड १८९४ ते १९५६ असा आहे. आपले सहकारी पोमेरॉय व मार्टीन यांना सोबत घेऊन त्याने सतत दहा वर्षे संशोधन करून १८००० व्यक्तींच्या मुलाखती घेऊन १९४८ साली ‘सेक्श्युअल बिहेविअर ऑफ ह्युमन मेल’ आणि १९५३ साली ‘सेक्श्युअल बिहेवियर ऑफ ह्युमन फिमेल’ असे दोन ग्रंथ प्रसिध्द केले. त्यामुळे अंधारात असणारे हे कामविश्व उजेडात आले.
डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या दाम्पत्याने लैंगिक संशोधनात मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी स्वयंसेवक म्हणून आलेल्या जोडीदारांना प्रत्येकी तीस डॉलर्स देऊन प्रयोगशाळेत संभोगक्रिया घडवून आणली. अध्यायावत उपकरणे आणि कॅमेरे वापरून काही निष्कर्ष काढले, नोंदी केल्या, लैंगिक बदल नमूद करून घेतले. कृत्रिम शिस्नात कॅमेरा बसवून योनीत होणारी स्थित्यंतरे अभ्यासली. १९६६ मध्ये या दांपत्याने ‘ह्युमन सेक्श्युअल रिस्पॉन्स’ हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्यानंतर लैंगिक असमर्थता आणि समस्या असणाऱ्या विवाहित जोडप्यांवर संशोधन व चिकित्सा करून १९७० मध्ये ‘ह्युमन सेक्श्युअल इंडेक्युसी’ हा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर जॉन मनी यांनी कामविश्वात आणखी मोलाची भर घालत लिंग-ओळख, लिंग-भूमिका, काम-आराखडा हे कामप्रवृत्तीच्या विकासातील असणारे महत्वाचे टप्पे जगासमोर ठेवले.
अशाप्रकारे कामविश्व आपल्यासमोर खुले झालेले असतांना त्याबद्दल विनाकारण बाऊ करून घेऊन किंवा ते ज्ञान म्हणजे अश्लील समजून आपले लैंगिक वर्तन समजून न घेता संसाराचा गाडा यशस्वी ‘कामा’शिवाय ओढत राहणे कितपत योग्य आहे?
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment