Thursday 17 November 2016

दांपत्यांचे प्रकार...

दांपत्यांचे प्रकार...



जगात किंवा आपल्या आजूबाजूला असंख्य नमुन्याची जोडपी आढळतात. जरा बारकाईने निरीक्षण केले की कोणत्या जोडप्याचे एकमेकांशी (पलंगावरही) पटते ते ओळखता येते. काही जोडपी इतरांसमोर मस्त मजेत सुखात असल्याचा आव आणतात, तर काही जोडपी इतरांपुढे देखील आपल्या जोडीदाराचा पाणउतारा करायला मागेपुढे पाहत नसतात. काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज विलसत असते, तर काही जोडपी कायम मरगळलेल्या, ओढग्रस्त आणि तणावपूर्ण चेहऱ्याने वावरत असतात...
क्युबर आणि हेरॉक या दोन मनोवैज्ञानिकांनी अनेक जोडप्यांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला की जगातील विवाहित दाम्पत्यांचे केवळ पाच प्रकारात वर्गीकरण करता येईल. थोड्याफार फरकाने प्रत्येक जोडपे यातील एकतरी वर्गात समाविष्ट करता येईल... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)विसंवादी जोडप्यांमध्ये कधीच सुसंवाद घडत नाही. दोघांची तोंडे छत्तीसच्या आकड्याप्रमाणे विरुध्द दिशेला असतात. समाजाच्या जोखडाखाली किंवा एक मजबुरी म्हणून ते संसाराचा गाडा ओढत असतात. त्यात प्रेमाचा लवलेश पासंगालाही पुरणारा नसतो. सदानकदा एकमेकांची उणीदुणी काढीत, भांडणे करीत, इतरांनाही शिव्याशाप देत रडतखडत आयुष्य कंठत असतात. यांचे जसे बाहेर वर्तन असते तसेच बेडवरही असते. मुळात ते एका अंथरुणावर झोपतच नसतात पण यदाकदाचित झोपलेच तर तिथेही त्यांची चांगलीच जुंपते! एकेमकांवर पराकोटीचा संशय घेणे यांच्या रक्तातच भिनलेले असते. जोडीदाराच्या कोणत्याही कृतीकडे ते संशयानेच पाहतात. अशा व्यस्त दाम्पत्यांमध्ये घटस्फोटाचे आणि विभक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशी जोडपी समाजात टीकेचा किंवा चघळण्याचा विषय बनलेली असतात.
२)दुसऱ्या प्रकारच्या दाम्पत्यांमध्ये सामंजस्य आढळते परंतु ते केवळ दिखाव्यापुरते असते. म्हणजेच ही जोडपी समाजापुढे आम्ही खूप सुखी आहोत असे भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु ते वैवाहिक आयुष्यात एकमेकांना सुखी ठेवू शकलेले नसतात. एकतर पुरुष तरी स्त्रीकडून तृप्त झालेला नसतो किंवा स्त्री तरी पुरुषाने तृप्त करून सुखी ठेवलेली नसते. असे दांपत्य एकमेकांच्या आवडीनिवडी जपतांना दिसतात मात्र ते तितकेसे खरे नसते. केवळ दिखावा या सदरात ते मोडते. अशी जोडपी जीवन एक कसेबसे जगण्याचे साधन समजून जगत राहतात. सामाजिक आयुष्यात तर ती सुखी समाधानी नसतातच तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी हार मानलेली असते. अशी दाम्पत्ये आत्महत्येचा पर्याय निवडतांना दिसतील.
३)तिसऱ्या प्रकारची जोडपी ही कमालीची स्वयंकेंद्रित असतात. दोघेही एकमेकांची स्पेस कसोशीने पाळतात, एकमेकांच्या कोणत्याच गोष्टीत दखल घेतांना दिसत नाहीत. त्याला/ तिला पाहिजे ते करू देत, मी नाही टोकणार... असा त्यांचा एकंदर अविर्भाव असतो. अशी दांपत्ये वैवाहिक जीवनात बेतासबात किंवा जशास तसे प्रकारचा प्रणय अंगीकारून तोलून मापून प्रेम करतात, मोजकाच सेक्स करतात. ही जोडपी देखील आयुष्यात सुखी ठरू शकत नाहीत. स्वतःची आत्मप्रौढी, आत्मगौरव, आत्मप्रशंसा यातच त्यांना स्वारस्य असते. जोडीदाराचे कौतुकसुद्धा ते तोलूनमापूनच करतांना दिसतील. त्यांच्यात प्रेम असते असे नाही, परंतु ते कमालीचे व्यावहारिक, काटेकोर आणि पर्यायाने यंत्रवत असे असते. म्हणून ही जोडपी समाजात थोडीबहुत आदर्श मानली जात असली तरी परिपूर्ण अशी नसतातच! स्पेस जपण्याच्या भानगडीमुळे अशी दांपत्ये एकमेकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत व्यभिचारास प्रवृत्त होतांना आढळतात.
४)चौथ्या प्रकारातील दांपत्ये स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचा अधिक विचार करतात. जोडीदाराच्या मतांचा आदर करीत साथ देतात. वैवाहिक आयुष्य अधिक मुक्तपणे आणि सर्वकाही झोकून देत व्यतीत करतांना दिसतात. मी, माझा/माझी जोडीदार आणि आमचे कुटुंब असे यांचे सुखी जग असते. जीवनातील प्रत्येक आनंद ते कुटुंबासह लुटण्याचा प्रयत्न करतात. जोडीदारांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास तर असतोच परंतु त्या विश्वासाला तडा जाऊ नये असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून कधीच घडत नसते. समाजातही अशा जोडप्यांना आदर्शवत मानले जाते. खंत एकच असते ती ही की अशी दांपत्ये समाजात मिसळत नाहीत, समाजकार्यात सहभाग नोंदवीत नाहीत, आपण भले, आपले कुटुंब भले असा त्यांचा जीवनविचार असतो. एकंदरीत अशी जोडपी कुटुंब’केंद्रित असतात. तरीही समाज त्यांना ‘समजूतदार दांपत्य’ नावाची पदवी बहाल करीत आलेला असतो.
५)पाचव्या प्रकारातील जोडपी एकदम आदर्शवत असतात. म्हणजे वरील चौथ्या प्रकारातील जोडपे सर्व निकष पूर्ण करून समाजात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजात मिसळणे, समाजकार्य करणे, इतरांना मदत करणे अशासाठी ते सदैव तत्पर असतात. वैवाहिक जीवनात ते हमखास यशस्वी असतात. जोडपे पूर्णतया एकमेकांसोबत तृप्त असते. त्यामुळे कुटुंबाचा काही वेळ समाजकार्याला दिला तर त्यांचा आक्षेप नसतो. त्यामुळे अशी जोडपी रब ने बना दी जोडी असे नावारूपाला येऊन समाज त्यांना आदर्श दांपत्य अशी सर्वोच्च पदवी प्रदान करतांना बिलकुल कचरत नाही असे दिसून येते. नवीन जोडप्यांना यांचाच आदर्श घ्या असे सुचविण्यास देखील समाज मागेपुढे पाहत नाही. म्हणजेच सर्वच पातळीवर यशस्वी ठरणारे जोडपे या प्रकारात येत असल्याने यांचा हेवा वाटणे साहजिक ठरते!!!
तेव्हा प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपण कोणत्या गटात जायचे हे आधीच ठरवून टाकावे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment